भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी अचानक त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याला ठाण्याच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या कांबळीची तब्येत स्थिर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोद कांबळींच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केलीय.
1991 मध्ये पदार्पण
विनोद कांबळीने 1991 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 1993 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. तो भारतासाठी सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा फलंदाज ठरला. अवघ्या 14 डावात त्याने ही कामगिरी केली. यानंतर त्याची कामगिरी ढासळत गेली.
विनोद कांबळीने भारतीय संघासाठी 17 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1084 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 4 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 104 सामन्यांमध्ये एकूण 2477 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने दोन शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना 2000 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.