मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. डॉक्टरांनी त्यांना येत्या तीन – चार दिवसात आराम मिळेल, अशी माहिती दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत विश्रांतीचा सल्ला दिला.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे, युवक नेते पार्थ पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.