सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

WhatsApp Group

नागपूर – कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य  नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना  ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते.

यावेळी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाचे महासंचालक विवेक फणसळकर, अपर पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी,  पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर आदी उपस्थित होते.

नागपूर येथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सांभाळत असताना विभागाने निष्पक्ष काम करताना कुणाच्याही दबावाला बळी न पडण्याची सूचना करताना उपमुख्यमंत्री  श्री. पवार म्हणाले की, पोलीस भवन ही वास्तू नागपूरच्या वैभवात भर घालणारी आहे. सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा मिळेल या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील पोलीस विभागाची  परंपरा व नावलौकिक संपूर्ण देशभर आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या सराफा व्यापाऱ्याचा चोरीसंदर्भात पोलिसांनी  सत्तावीस तासांत तपास करुन सहा कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याबद्दल नागपूर पोलिसांचे अभिनंदन करताना सर्व सराफा व्यापाऱ्यांनी  कामावर असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती ठेवावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या 87 पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन मंडळाने पोलीस विभागासाठी वाहने व इतर आवश्यक सुविधांसाठी  निधी उपलब्ध करुन द्यावा. अशा सूचना पालकमंत्र्यांना दिल्या.

नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी तसेच पुण्याच्या धर्तीवर सर्व सुविधा असलेल्या शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी  निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.