मोठी बातमी! दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक

WhatsApp Group

दिल्लीतील ‘आप’ सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रींगप्रकरणामध्ये त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीने ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता थेट अटकेची कारवाई झाल्यामुळे केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ईडीच्या कारवाईवरुन थेट भाजपावर निशाणा साधला आहे. “सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ८ वर्षांपासून एक बनावट केस चालवली जात आहे. आतापर्यंत अनेकदा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर मधल्या काळात ईडीने त्यांना बोलावणंच बंद केलं होतं. कारण त्यात ईडीला काहीच सापडलं नव्हतं. आता पुन्हा त्यांनी जैन यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कारण ते हिमाचल निवडणुकीमध्ये आपचे निवडणूक प्रभारी आहेत”, असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं आहे.

तसेच हिमाचलमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार आहे आणि त्यामुळेच सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. जेणेकरुन ते हिमाचलला जाता कामा नयेत, असाही आरोप मनिष सिसोदिया यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सत्येंद्र जैन यांनी 2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा त्यांच्यावर अ आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत.