आयपीएल क्वालिफायर 2: आज दिल्ली-केकेआरसाठी ‘करो या मरो’चा सामना

WhatsApp Group

आयपीएल 14 च्या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ बुधवारी शारजाहमध्ये आमने- सामने येणार आहेत. आपल्या पहिल्या IPL विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्लीला चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या कोलकाताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

पहिल्या जेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्लीला अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी तुफान फॉर्मात असलेल्या कोलकाताला हरवणे हे मोठे आव्हान असेल. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना 15 ऑक्टोबरला अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी होईल.

सोमवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाताने बंगळुरूला पराभूत केले, तर क्वालिफायर 1 मध्ये दिल्ली चेन्नईकडून पराभूत झाली. जर रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाला कोलकाताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, तर त्यांचा यंदाचा आयपीएल प्रवास इथेच संपेल.

आयपीएलमध्ये आजवर दोन्ही संघामध्ये 27 सामने झाले असून यात कोलकात्याने 15 तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातीस शेवटच्या 5 सामन्यांविषयी बोलायचे झाले तर दिल्लीने 3 तर कोलकात्याने 2 सामने जिंकले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षक म्हणून सामील झाल्यापासून दिल्लीचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 2019 मध्ये संघ तिसऱ्या क्रमांकावर होता, तर गेल्या वर्षी दिल्लीला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश होते.

दिल्लीचा संघ स्पर्धेतील सर्वात संतुलित संघांपैकी एक आहे. मजबूत फलंदाजीच्या व्यतिरिक्त, त्याच्याकडे प्रभावी वेगवान गोलंदाजी आक्रमणही आहे, ज्याला दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडून भरपूर पाठिंबा मिळतो.

शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांच्या उपस्थितीत टीमचा टॉप ऑर्डर खूप मजबूत आहे. पंत आणि शिमरॉन हेटमायर मधल्या फळीला बळ देतात. धवन गेल्या मोसमात 618 धावांसह दुसरा क्रमांकावरील यशस्वी फलंदाज होता, तर चालू हंगामातही त्याने 551 धावा केल्या आहेत. त्याचा सलामीचा साथीदार पृथ्वी शॉनेही चेन्नईविरुद्ध प्रभावी कामगिरी केली.

गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा (2020 पर्पल कॅप विजेता) आणि त्याचा सहकारी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्सिया यांची जोडी चमकदार कामगिरी करत आहे. पण रबाडाला गेल्या चार सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही. वेगवान गोलंदाज अवेश खाननेही चालू हंगामात आतापर्यंत 23 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, आवेश खान, रिपल पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरीवाला, शिमरॉन हेटमयार, स्टिव्ह स्मिथ, आनरिख नॉर्किए, कागिसो रबाडा, टॉम करन, बेन ड्वारशियस, मार्कस स्टोइनिस, सॅम बिलिंग्ज.

कोलकाता नाइट रायडर्स – ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, गुरकीरत, करुण नायर, शेल्डन जॅक्सन, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, पवन नेगी, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, एम प्रसिध कृष्णा, संदीप वॉरियर, वैभव अरोरा, सुनील नरिन, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, लॉकी फग्र्युसन, टीम साऊथी, बेन कटिंग, टीम सायफर्ट.