समृध्द मराठी भाषेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: महाराष्ट्राला थोर संत, विचारवंत, प्रबोधनकार, सामाजिक शास्त्रज्ञ यांची परंपरा लाभलेली आहे. यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला आहे.’पुस्तकांचे गाव’ या सारखे उत्तम उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते, अभिवाचनाच्या कट्ट्याचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाषा संचालक विजया डोनीकर, भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, साहित्याची आवड ही वाचनातूनच होत असते. त्यामुळे शाळांमध्ये वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.जे लोक वाचन करतात त्यांनाच वाचनाचे महत्व कळत असते त्यामुळे शासनही त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.