मुंबई – गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंत्रालयातून राजभवनाकडे जात असतांना इथे या कोपऱ्यात स्वच्छता पाहायला मिळत नव्हती. या परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केलं. त्यातूनच इथं खूप चांगला स्पॉट उभा राहिला आहे.
गिरगाव चौपाटीवरील #दर्शकगॅलरी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. याप्रसंगी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री @AUThackeray, खासदार @ianildesai, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल उपस्थित होते. pic.twitter.com/QYl2YPw8fV
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2022
मुंबईकर किंवा बाहेरचे पर्यटक गिरगाव चौपाटीला येतात. त्यांना इथे या गॅलरीत आल्यावर नक्कीच खूप आनंद मिळेल. भरतीच्यावेळी आपण समुद्रात उभे आहोत असा आनंद देणारा हा स्पॉट उभा राहिला आहे. चैत्यभूमीच्या मागेही अशीच सुंदर दर्शक गॅलरी उभी करण्यात आली. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून अनेक चांगली कामं मुंबईत सुरु आहेत,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
#गिरगावचौपाटी वरील दुर्लक्षित हा स्पॉट एक नवीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन माझा सहकारी @AUThackeray याने विकसित केला. मुंबईत हा एक लोकप्रिय सेल्फी पॉईंट बनेल. आदित्य ठाकरे जे काम सुरू करतो ते पूर्णत्वास नेईपर्यंत त्यावर लक्ष ठेवतो – उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks pic.twitter.com/5zFIm3hf0l
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2022
स्वराज्यभूमी लगत गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला वाळकेश्वर मार्ग व कवीवर्य भा.रा. तांबे चौकालगत ही गॅलरी उभी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी समुद्रात वाहुन नेणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे 475 चौ.मि. आकाराचा ‘व्हिविंग डेक’ – दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे.
या ठिकाणावरून अरबी समुद्राचे, गिरगांव चौपाटीचे व क्विन्स नेकलेस अशी ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हच्या विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे. हा डेक समुद्राच्या लाटांची ऊंची, दाब आदी सर्व बाबींचा तांत्रिक दृष्टीकोन अभ्यास करुन त्याअनुरुप उभारण्यात आला आहे.