अमरनाथ यांची ‘अमर’कथा: गोष्ट भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची!

WhatsApp Group

“मैनु पता है कि हो रहा है”!! संतापलेल्या लालाचे हे शब्द ऐकून तत्कालीन कर्णधार महाराजा कुमार विजयनगरम उर्फ विझी यांचे डोके फिरले. संघ मॅनेजर मेजर जॅक ब्रिटन-जोन्स यांनी शिस्तभंगाची कार्यवाही करत त्याला मायदेशी पाठवले. साल होते १९३६, त्या खेळाडूला पुढची कसोटी खेळायला १०-१२ वर्षे वाट बघावी लागली. नानिक अमरनाथ भारद्वाज उर्फ लाला अमरनाथ दंतकथा होते!

लहानपणी घरासमोरील मैदानात क्रिकेट खेळणारे ब्रिटिश बघून हा खेळ त्याच्या मनात रुजला. पुढे त्याच्या आईने खतपाणी घातल्यामुळे ही क्रिकेटची आवड चांगलीच फोफावली. आजोबा लाहोरचे, तिथे आईच्या निधनानंतर हा गेला शिकायला. तिथे कॉलेजातील संघात क्रिकेट खेळता खेळता यांच्यावर फ्रॅंक टॅरंट यांची नजर गेली. अचूक ओळखला टॅरंट साहेबांनी याला. हे टॅरंट साहेब पतियाळाचे महाराज भूपिंदर सिंग यांचे क्रिकेट कोच. त्यामुळे लाला सरळ आला तो सिंग महाराजांच्या देखरेखीखालीच.

भारत अजून स्वतंत्र व्हायचा आधीचा तो काळ. त्या काळात क्रिकेट खेळणे हे मोठेच जोखमीचे काम. अमरनाथ यांनी १९३३ ला इंग्लंडविरुद्ध आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होत. पहिल्या इनिंग मध्ये ३८ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ११८ सह लालाचे आगमन जबरदस्त पद्धतीने झाले. भारताकडून कसोटीत झालेले हे पाहिलेवाहिले शतक. ते झाले तो दिवस होता १७ डिसेंबर १९३३.

शतक पूर्ण झाल्यावर मैदानावर उसळलेल्या जनसमुदायाचे वर्णन करताना नॉन स्ट्रायकर एन्डला असलेले सी के नायडू म्हणतात “मैदानावर आनंदाने बेहोष झालेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींनी लालाला घेराव घातला होता. त्याच्यावर स्त्रिया पुष्पगुच्छ, फुले, माळा यांचा वर्षाव करत होत्या.” हे बघून लालाचा आम्हाला फारच हेवा वाटला असे गंमतीने सी के नायडू नंतर म्हटले होते! अखेर भारताचे पहिले कसोटी शतक जे होते!

परंतु अमरनाथची बहरणारी कारकीर्द दुसऱ्या महायुद्धामुळे खुंटली. तेव्हा सातत्याने दौरे होण्याचा तो काळ नव्हता. १९४७-४८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लालाने प्रथम श्रेणी सामन्यात ११६२ धावांचा रतीब घातला. त्यापैकी त्याची मेलबर्न मधील खेळी बघून खुद्द सर डॉन ब्रॅडमन प्रभावित झाले. “मी पाहिलेली एम सी जी वरील सर्वश्रेष्ठ खेळी” असे ब्रॅडमन यांनी लालाच्या एका खेळीबद्दल मत व्यक्त केले. क्रिकेटमधील सर्वोच्च प्रशस्तीपत्रक होते ते! याच टूरवर लाला अमरनाथ भारतीय संघाचा कर्णधार झाला. स्वतंत्र भारताचा पहिला कर्णधार! सी के नायडू, नवाब पतौडी आणि विझी यांच्यानंतरचा “चौथा” कर्णधार!

१९५२ साली भारतात आलेल्या इंग्लड संघाला हरवत भारताने प्रथमच कसोटी सामना जिंकला. क्रिकेटमध्ये आणि एकूणच स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रात रांगणाऱ्या एका देशासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. आत्मविश्वास मिळवून देणारी, आपणही गोऱ्याना हरवू शकतो हे मनावर ठसवणारी! त्याच वर्षात पुढे भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवत कसोटी मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला. लाला अमरनाथ त्या विजयाचा ध्वजवाहक होता, कर्णधार होता.

असा कालखंड जेव्हा देश पायांवर उभा राहत होता. एक असा कालखंड जेव्हा खेळ हा विभाग अडगळीत टाकला तरीही काही गजहब झाला नसता, कारण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या! अशावेळी कोणत्याही खेळाला ‘राजाश्रय’ मिळणे महत्वाचे असते. क्रिकेटला तो मिळाला अनेक संस्थानात. बडोदा, विजयनगरम, पतियाळा अशा ठिकाणी. त्या बदल्यात क्रिकेटचा क देखील माहीत नसलेले अनेक संस्थानिक क्रिकेट खेळण्याचा ‘हट्ट’ पूर्ण करून घेण्यात पूढे होते. महाराजा कुमार ऑफ विजयनगरम उर्फ विझी हा त्यातलाच एक. पैशाच्या बळावर आणि राजाश्रयाच्या उपकरावर ही हौस त्याने भागवून घेतली. प्रत्यक्षात ते अत्यंत वाईट क्रिकेट खेळाडू आणि कर्णधार होते. अशाच एका सामन्यात लाला आणि विझी यांच्यात उपरोक्त किस्सा घडला.

लाला यांची तीनही मुले, मोहिंदर, सुरींदर आणि राजिंदर भारताकडून क्रिकेट खेळली. लाला एक उपयुक्त गोलंदाज देखील होते. त्यांच्या नावावर ४५ कसोटी बळी आहेत. सर डॉन ब्रॅडमन यांना कसोटीत ‘हिट विकेट’ पद्धतीने बाद करणारे लाला एकमेव गोलंदाज. कसोटी पदर्पणात शतक करणारी पिता पुत्रांची लाला आणि मोहिंदर ही आजवरची एकमेव जोडी! त्या शतकाला आज ८८ वर्षे झाली. त्यानंतर गेल्या ८८ वर्षांत कित्येक भारतीयांनी शतकांचे विक्रम रचले, राशींच्या राशी रचल्या. परंतु हे “floodgate” उघणारे पाहिले लाला अमरनाथ भारद्वाज हे होते.

आज मागे वळून पाहताना तो काळ मध्ययुगीन वाटावा इतपत क्रिकेटमध्ये बदल झालेत. तरीही पूर्व इतिहासाचे कोणतेही पाठबळ नसताना एका नव्यानेच स्वतंत्र झालेल्या देशाची तितकीच नवखी आणि अननुभवी टीम स्वतःच्या पायावर उभी करण्यात या शतकाचे काम पायाभरणी इतके मोठे आहे.