हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने 4 मुलांचा मृत्यू, 36 नवजात बालकांना वाचवण्यात यश

WhatsApp Group

भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या हमीदिया कॅम्पसमध्ये सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील कमला नेहरू हॉस्पिटलच्या बालरोग विभागात आग लागली. एकूण 40 मुलांना एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, या अपघातात 4 मुलांचा भाजल्याने मृत्यू झाला. तर 36 मुलांना दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही घटना ‘अत्यंत वेदनादायी’ आहे असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. याची चौकशी आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे एसीएस मोहम्मद सुलेमान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनीही रुग्णालयात पोहोचून बचावकार्यात मदत केली.


विश्वास सारंग यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की वॉर्डातील स्थिती ‘अत्यंत भयानक’ होती. सीएम शिवराज यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, ज्यामध्ये आयसीयू देखील आहे. फतेहगढ अग्निशमन केंद्राचे प्रभारी झुबीर खान यांनी सांगितले की, रात्री 9 च्या सुमारास आग लागली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

या अपघातानंतर रुग्णालयाचा परिसर अत्यंत धोकादायक झाला होता. मुलांचा जीव वाचवण्याऐवजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच पळ काढल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे.