”शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे, परवानगी मिळाली नाही तर…”, दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी

मुंबई : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा करण्यात येत आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी इडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.
सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये तीन ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयामध्ये आलेल्या संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू विनायक राऊत आणि वकील होते. या व्यक्तीरिक्त न्यायालयामध्ये शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनीही राऊतांची भेट घेतली. यावेळी बोलताना दसरा मेळाव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना संजय राऊतांकडून देण्यात आल्या.
दसरा मेळाव्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही मैदान उपलब्ध व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवाजीपार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी हेच मैदान यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केलं आहे.