खामगाव : अनेकवेळा अशा बातम्या समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अशीच एक विचित्र घटना घडली आहे, ज्यावर विश्वास बसणे कठीण आहे. रविवारी रात्री सुताळा पुरा गावात राहणाऱ्या अशोक सातव यांच्या घरी एक व्यक्ती अचानक आली. या व्यक्तीची वेशभूषा अगदी गजानन महाराजांशी मिळतीजुळती होती, त्यामुळे गजानन महाराज प्रत्यक्षात आल्याची बातमी संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. जाणून घेऊया सविस्तर बातमी….
होय, ही बाब लोकांना समजताच गजानन महाराजांसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सातव यांच्या घराभोवती भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हे सर्व प्रकरण पाहता अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील सुताळा पुरा भागात अशोक सातव यांचे घर आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घरासमोर अचानक गजानन महाराजांची वेशभूषा केलेला एक व्यक्ती हजर झाला. मला तुमच्या घरी जेवण करायचे आहे, असे या व्यक्तीने सातव कुटुंबीयांना सांगितले. अशा परिस्थितीत सातव कुटुंबीयांनी या व्यक्तीसाठी अन्नदान केले. दरम्यान, शेजाऱ्यांनी या व्यक्तीला जेवण करताना पाहिले. सातव यांच्या घरी गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचे त्यांना वाटले. ही बातमी खामगाव शहरात पसरली, त्यानंतर मोठ्या संख्येने लोक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले.
पोलिसांनी भाविकांची गर्दी हटवली
सातव यांच्या घरासमोर भाविकांची गर्दी जमली आणि गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचे लोक म्हणू लागले. येथे शेकडो लोक दर्शनासाठी जमले होते आणि संत गजानन महाराजांचा जयजयकार करत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून भाविकांची गर्दी हटवली. पण ही व्यक्ती कोण आहे..? कुठून आला..? याबाबत अद्याप कोणालाच माहिती नाही. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्यक्तीचे सत्य काय आहे, याविषयी अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.