DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा संयम सुटला! महागाई भत्त्यात विलंबाने उद्या देशव्यापी निदर्शने; ८ व्या वेतन आयोगाबाबतही नाराजी

WhatsApp Group

नवी दिल्ली: एप्रिल महिना अर्धा संपला तरी अद्याप महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा न झाल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारचा विलंब होत असल्याचे समोर येत असून, आता आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, १६ एप्रिल २०२६ रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचारी आपल्या कार्यस्थळावर निदर्शने करणार आहेत.

लंच ब्रेक मध्ये होणार आंदोलन

‘कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स’ (CCGEW) ने यासंदर्भात कॅबिनेट सचिवांना अधिकृत नोटीस दिली आहे. या सूचनेनुसार, १६ एप्रिल रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत (Lunch Break) सर्व सदस्य आपापल्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदवतील. या आंदोलनाचा मुख्य उद्देश प्रलंबित महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठीची महागाई सवलत (DR) यांची तात्काळ घोषणा करणे हा आहे.

७ व्या वेतन आयोगाच्या मर्यादेतच अडकली वाढ?

७ व्या वेतन आयोगाची मुदत डिसेंबर २०२५ मध्येच संपुष्टात आली आहे. नियमानुसार, आता ८ वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. सद्यस्थितीत महागाई भत्त्यातील वाढ ही ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच केली जाणार आहे. मात्र, वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) होणाऱ्या या वाढीपैकी जानेवारी २०२६ ची वाढ एप्रिल उजाडला तरी जाहीर न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

अर्थमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

या आंदोलनापूर्वी विविध कर्मचारी संघटनांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून महागाई भत्ता लवकरात लवकर वाढवण्याची विनंती केली होती. १ जानेवारी २०२६ पासूनचा थकीत भत्ता आणि पेन्शनधारकांना मिळणारी सवलत तात्काळ द्यावी, अशी आग्रही मागणी या पत्रात करण्यात आली होती. मात्र, सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.