CWG 2022: दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने रचला इतिहास, लॉन बॉलमध्ये जिंकले सुवर्णपदक

WhatsApp Group

CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पाचव्या दिवशी मंगळवारी भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात लॉन बॉलमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. तर CWG 2022 मध्ये भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. CWG 2022 मध्ये भारताकडे आता 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदके आहेत.

इतिहासात प्रथमच भारताचा संघ लॉन बॉल्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकला आहे. लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ चांगल्या फ़ॉर्ममध्ये होता. संघातील रूपा राणी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी अप्रतिम अशी कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेला टक्कर दिली. पण काही काळ दक्षिण आफ्रिकेनेही आघाडी कायम राखली होती. मात्र शेवटच्या फेरीच्या अगदी आधी, भारताने 5 गुणांची आघाडी घेतली आणि अखेरीस एकूण 7 गुणांच्या आघाडीसह सामना जिंकला.

लॉन बॉल व्यतिरिक्त, बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक संघ आणि टेबल टेनिसमधील पुरुष संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून आपली पदके निश्चित केली. वेटलिफ्टिंगच्या अंतिम फेरीत विविध प्रकारात पूनम यादव, विकास ठाकूर आणि उषा बन्नूर या 3 भारतीय खेळाडू अंतिम स्पर्धेत पदकांच्या आशा बाळगून आहेत. भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक 7 पदके जिंकली आहेत.