CSK vs KKR: अजिंक्य रहाणेची ‘ती’ चूक केकेआरला पडली महाग! चेन्नईचं शानदार कमबॅक; 32 धावांनी मिळवला विजय

WhatsApp Group

आयपीएल २०२६ मध्ये सलग तीन पराभव पत्करल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) अखेर विजयाची चव चाखली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) सामन्यात चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवत ३२ धावांनी विजय मिळवला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्याच अंगाशी आला असून, फलंदाजी करताना त्याची संथ खेळी पराभवाचे मुख्य कारण ठरली आहे.

१९२ धावांचे लक्ष्य

टॉस गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड अवघ्या ७ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने (४८ धावा) आणि युवा आयुष म्हात्रेने (३८ धावा) केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. म्हात्रेने अवघ्या १७ चेंडूत ही फटकेबाजी केली. डेवाल्ड ब्रेविसनेही ४१ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत सरफराज खान आणि शिवम दुबे यांच्या फटकेबाजीमुळे चेन्नईने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९२ धावांचा सन्मानजनक धावसंख्या उभारली. केकेआरकडून कार्तिक त्यागीने २ बळी घेतले.

रहाणेची संथ फलंदाजी

१९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेला फिन ॲलन १ धावेवर बाद झाला. सुनील नरेनने २४ धावा करून आशा पल्लवित केल्या होत्या, पण कर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीने सर्वांना निराश केले. रहाणेने २२ चेंडूत केवळ २८ धावा केल्या, ज्यामुळे खालच्या फळीतील फलंदाजांवर धावगतीचे दडपण वाढले. मधल्या फळीत अंगकृष रघुवंशी (१७ धावा) स्वस्त बाद झाला, तर कॅमेरून ग्रीन ‘गोल्डन डक’चा शिकार ठरला.

सीएसकेचा विजय

शेवटच्या षटकांत रमनदीप सिंह (३५ धावा) आणि रोवमैन पॉवेल (३१ धावा) यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा ठरला नाही. चेन्नईसाठी फिरकीपटू नूर अहमदने ३ बळी घेत केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला अंशुल कंबोजने २ बळी घेत उत्तम साथ दिली. निर्धारित २० षटकांत केकेआरचा संघ ७ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि चेन्नईने हा सामना ३२ धावांनी खिशात टाकला.