आयपीएल २०२६ मध्ये आधीच संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) समोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. संघाचा या हंगामातील सर्वात यशस्वी फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संघ व्यवस्थापनाचे टेन्शन लक्षणीयरीत्या वाढले आहे.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार
चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना आयुषच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला ६ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच तो यंदाच्या पूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. म्हात्रेने या हंगामात ६ डावांमध्ये ३३.५० च्या सरासरीने २०१ धावा केल्या होत्या, ज्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या दोन धडाकेबाज अर्धशतकांचा समावेश होता. १७७.८७ च्या स्फोटक स्ट्राईक रेटमुळे तो चेन्नईच्या फलंदाजीचा मुख्य आधार बनला होता.
Official Announcement
Ayush Mhatre has been ruled out of the remainder of IPL 2026 due to a left hamstring injury sustained while batting during the match against Sunrisers Hyderabad on April 18.
Ayush’s injury will require a rehabilitation period of 6-12 weeks.
We wish Ayush… pic.twitter.com/7bGrFvqjY9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2026
दुखापतींनी चेन्नईला ग्रासले
यंदाचा हंगाम चेन्नईसाठी ‘बॅड पॅच’ ठरताना दिसत आहे. आयुष म्हात्रेच्या आधी वेगवान गोलंदाज नाथन एलिस आणि खलील अहमद हे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे संघाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी देखील दुखापतीमुळे आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल बिघडला असून, आतापर्यंत ६ पैकी केवळ २ सामने जिंकण्यात चेन्नईला यश आले आहे.
कोणाला मिळणार संधी?
म्हात्रे बाहेर पडल्यामुळे आता सलामीला किंवा मधल्या फळीत कोणाला स्थान द्यायचे, हा पेच व्यवस्थापनासमोर आहे. सध्या बेंचवर असलेल्या उर्विल पटेलला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उर्विलने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी, म्हात्रेची जागा तो कशी भरून काढतो, यावर चेन्नईचे पुढील भवितव्य अवलंबून असेल. सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर असलेल्या चेन्नईला पुनरागमन करण्यासाठी आता मोठी कसरत करावी लागणार आहे.
