रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसी कोचला बनवलं ‘हनिमून सुईट’, व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई

WhatsApp Group

मुंबई : भारतीय रेल्वेकडून नांदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्यातील खासगी कुपेमधील (दोन जणांसाठी दिलेली रुम) एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे रेल्वे प्रशासनाकडून टीसीचे निलंबन करण्यात आले आहे. नक्की काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया.

 

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने ऑनलाइन पद्धतीने एका खासगी डेकोरेटला बोलावले होते. याच्याकडून ट्रेन क्रमांक 11002 नांदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कुपेचे डेकोरेशन करुन घेण्यात आले होते. जालना रेल्वे स्थानकात संबंधित डेकोरेटर ट्रेनमध्ये चढला. या डेकोरेटरला अनधिकृतपणे डेकोरेशनसाठी परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. खरंतर ही बाब गंभीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

या प्रकरणी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण घटनेची सखोल विभागीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. चौकशी अहवालानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

 

रेल्वे प्रशासनाने संबंधित डेकोरेटरविरोधातही कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत परवानगीशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश करणे, तिकीटाशिवाय प्रवास करणे आणि रेल्वे परिसरात अनधिकृत घुसखोरी करणे असे आरोप लावण्यात आले आहेत. डेकोरेटच्या विरोधात रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.