77व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी देश सज्ज

ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोहळ्याचा प्रारंभ

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023ला ऐतिहासिक लाल किल्यावरुन 77व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा  प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप  होणार आहे. 12 मार्च 2021ला अहमदाबाद मध्ये साबरमती आश्रमातून पंतप्रधानांनी याचा प्रारंभ केला होता. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा  नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल.

77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

विशेष अतिथी

लाल किल्यावर होणाऱ्या समारंभासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या सुमारे 1800 जणांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र  सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून हा उपक्रम आहे.

या विशेष अतिथीमध्ये 660 पेक्षा जास्त व्’हायब्रंट व्हिलेजेस’चे 400 सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील 250 व्यक्ती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमधले प्रत्येकी 50 व्यक्ती, सेन्ट्रल विस्टा प्रकल्प, नवे संसद भवन, सीमावर्ती भागातली  रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजना  यासाठी काम करणारे 50 श्रमयोगी (बांधकाम मजूर), 50 खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छिमार वर्गातले प्रत्येकी 50 जणांचा समावेश आहे. यापैकी काही विशेष अतिथी दिल्लीमधल्या आपल्या मुक्कामात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील व संरक्षण राज्यमंत्री  अजय भट्ट यांची भेट घेतील.

प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशामधल्या 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक वेशात लाल किल्यावरच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

‘सेल्फी पॉइंटस’

केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉइंटस’ 12 महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे.

‘सेल्फी पॉइंटस’मध्ये, जागतिक आशा : लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर 15 – 20 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या 12 पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

ई–निमंत्रण

सर्व अधिकृत निमंत्रणे आमंत्रण पोर्टल (http://www.aamantran.mod.gov.in/) द्वारे पाठवण्यात आली आहेत. या पोर्टल द्वारे 17,000 ई–निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.