Coronavirus News Updates: पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांत 32 हजार नवीन रुग्णांची नोंद

Coronavirus Update: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. बुधवारी चीनमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या 24 तासांत 31656 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी उडी आहे. ही आकडेवारी एप्रिलच्या मध्यात नोंदवलेल्या 29,390 संसर्गापेक्षा जास्त आहे. एका दिवसापूर्वी चीनमध्ये करोनाचे 28 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते.
चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी सहा महिन्यांनंतर एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. करोना बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. आरोग्य विभागाचे पथक जास्तीत जास्त कोरोना चाचणी आणि क्वारंटाईनवर भर देत आहे.
चीनमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता कोविडचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. आजपासून राजधानीत सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी 48 तास आधी निगेटिव्ह पीसीआर कोविड चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच लोकांना आता शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, सरकारी कार्यालयात जाण्यासाठी कोविड रिपोर्ट दाखवावा लागेल. यासोबतच लोकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बीजिंगमध्ये शाळा बंद
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बीजिंगमध्ये कोरोनाचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. कोविड-19 चा धोका पाहता चीन सरकारने बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद केल्या आहेत. शासनाने शाळांना ऑनलाईन अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक, बीजिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. हे पाहता चीन सरकारने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बीजिंगसह इतर अनेक भागात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने तेथील शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही उद्याने आणि जिमही बंद करण्यात आली आहेत. चीनच्या चाओयांग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तेथील कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना गरज नसल्यास घरीच राहण्याचा आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे.