मुंबई : मुंबईतील बंगाली समाजाने वैद्यकीय, कला, चित्रपट, रंगभूमी, इतिहास, पत्रकारिता व न्यायपालिका यांसह अनेक क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाली समाज अतिशय प्रतिभावंत असून या समाजाचे मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २०) राजभवन मुंबई येथे प्रथमच ‘पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरे करण्याच्या प्रथेनुसार पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
पश्चिम बंगालने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठी भूमिका बजावली असल्याचे सांगून राज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारखे द्रष्टे नेते दिले आहेत. रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ‘जन गण मन’ राष्ट्रगीत ही बंगालची देशाला देण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशन या संस्थेचा मुंबई येथील आश्रम यंदा स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद करून मुंबई येथून स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्व धर्म संसदेत सहभागी होण्याकरिता गेले होते याचे स्मरण राज्यपालांनी केले.
राज्यात तसेच मुंबई येथे अनेक ठिकाणी दुर्गा पूजा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात व काही दुर्गा पूजा मंडळे तर १०० वर्षे जुनी आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.
पश्चिम बंगालने केवळ व्यापार वाणिज्य या क्षेत्रांमध्येच नाही, तर संसदीय लोकशाहीमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान विसरता येत नाही असे राज्यपालांनी सांगितले.
राज्य स्थापना दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना परस्परांना समजण्याची तसेच आपली सामायिक संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होते, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी रामकृष्ण मठ मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद महाराज, ज्येष्ठ तबला व सतार वादक पं. नयन घोष, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ एस. भट्टाचार्य, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी, सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलच्या संचालक शारोनी मल्लिक, ताज हॉटेल्सचे उपाध्यक्ष शोमनाथ मुखर्जी, हिंदुजा हॉस्पिटलचे मुख्याधिकारी जॉय चक्रवर्ती, ग्रँट मेडिकल कॉलेज येथील निवृत्त सर्जन प्रा. डॉ. गौतम सेन व श्रीजोन फाउंडेशनच्या अध्यक्ष कमोलिका गुहा ठाकुरता यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीजोन फाउंडेशनच्यावतीने पश्चिम बंगालची सांस्कृतिक झलक दाखविणाऱ्या संगीत, नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईतील बंगाली भाषिक मान्यवर उपस्थित होते.