उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

WhatsApp Group

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागल्याची टीका होऊ लागली होती. पण सिंदुधुर्गामध्ये मात्र, नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता. बाळा गावडेंच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामध्ये खळबळ उडाली होती.

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडी मतदार संघातून बाळा गावडे यांना मिळाली होती. काँग्रेसकडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. तसेच यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बाळा गावडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चीदानंद बुगडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे, किरण गावडे, वैभव सुतार, अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .