
मालाड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अशोक बॅनर्जी (वय ९१) यांचे मुंबईत आकस्मिक निधन झाले. शुक्रवारी (ता. १६) दुपारी अंधेरी पूर्व येथील निवासस्थानात ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर माकपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारसी पाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळचे पूर्वीच्या पूर्व बंगालच्या ढाका येथील अशोक बॅनर्जी यांनी पूर्ण आयुष्य मुंबईत व्यतित केले. ते संपूर्ण आयुष्य अविवाहित होते. दीर्घकाळ माकपच्या ‘सिटू’ या कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि पक्षाच्या राज्य कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले.
आयुष्याच्या अखेरपर्यंत अशोक बॅनर्जी कार्यरत होते. ‘सिटू’च्या अंधेरी येथील कार्यालयात येऊन ते संघटनेच्या दैनंदिन कामकाजात सहभाग घेत असत. रविवारी (ता. ११) ते शेवटचे कार्यालयात आले, पण तब्येत बरी नसल्याने पुढचे तीन दिवस ते ते कार्यालयात आले नाहीत. त्यांचा फोन न लागल्याने शुक्रवारी (ता. १६) दुपारी त्यांची विचारपूस करण्यासाठी काही कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले. आतमधून त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा बॅनर्जी स्नानगृहात मृतावस्थेत आढळून आले. स्नानगृहात घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू गुरुवारीच झाला असावा असे सांगितले जात आहे.
अशोक बॅनर्जी यांना लेखक होण्याची इच्छा होती. त्यासाठी वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी घरदार सोडले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण देशभ्रमंती केली. छोटेमोठे काम करून त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. तत्कालीन कम्युनिस्ट नेते डी. एस. वैद्य यांच्या संपर्कात आल्यानंतर ते डाव्या चळवळीत आले. गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. फेरीवाले, असंघटित कामगारांना संघटित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनानंतर डाव्या चळवळीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.