Commonwealth Games 2030: 20 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धा पुन्हा भारतात; पण दिल्लीऐवजी ‘या’ शहराची निवड
Commonwealth Games 2030 India
संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भारताला देण्यात आले असून ही प्रतिष्ठित मेगा स्पर्धा यावेळी गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडणार आहे. यामुळे तब्बल २० वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा भारतात होत असून, यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीने या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या महासभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यजमानपदासाठी भारतासोबत नायजेरियातील अबुजा हे शहरही शर्यतीत होते, मात्र अखेर अहमदाबादच्या बाजूने कौल लागला. आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने आणि यशस्वी आयोजनाचा अनुभव यामुळे अहमदाबादने ही स्पर्धा जिंकली.
📣The 2030 Commonwealth Games will be hosted by Amdavad, India!!
At the Commonwealth Sport General Assembly in Glasgow, Commonwealth Games Northern Ireland was delighted to support the awarding of hosting rights for the 2030 Games to the city of Amdavad, India! pic.twitter.com/SDV3esnp1C
— Commonwealth Games Northern Ireland (@GoTeamNI) November 26, 2025
गेल्या काही वर्षांत अहमदाबादमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली असून नरेंद्र मोदी स्टेडियमसारख्या जागतिक दर्जाच्या संकुलामुळे शहराची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. याच शहराने क्रिकेट विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांचेही आयोजन यशस्वीरीत्या केले आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धांसाठी अहमदाबादची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवेळी खर्चाचा मोठा वाद झाला होता. सुरुवातीला सुमारे १,६०० कोटी रुपयांचा अंदाज असताना प्रत्यक्षात सुमारे ७०,००० कोटी रुपयांपर्यंत खर्च वाढल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे २०३० च्या स्पर्धांसाठी नियोजनबद्ध आणि पारदर्शक खर्च व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
याशिवाय, २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद ग्लासगोला देण्यात आले असून या स्पर्धेत केवळ १० खेळांचा समावेश करण्यात आला आहे. कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन आणि हॉकीसारखे महत्त्वाचे खेळ वगळण्यात आल्याने भारताने या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. विशेषतः कुस्ती आणि नेमबाजीमध्ये भारताने नेहमीच मोठ्या प्रमाणात पदके जिंकली असल्याने हा निर्णय देशासाठी निराशाजनक ठरला. मात्र, २०३० मध्ये भारतात होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये हे सर्व खेळ पुन्हा समाविष्ट केले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
