राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई: ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ मध्ये कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. कला, साहित्य, उद्योग, राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील प्रख्यात व्यक्तींच्या संकल्पनांच्या आदान-प्रदानासाठी दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी हा कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे.

मुलाखतीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचे लोकाभिमुख, विकासाभिमुख’ सरकार असेल. गेल्या तीन महिन्यात जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले जात आहेत. राज्य शासन विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. सण आणि उत्सव आता उत्साहात साजरे केले जात आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची  अर्थव्यवस्था सुधारते आहे. राज्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

औद्योगिक करारांची शंभर टक्के अंमलबजावणी

राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प दिले जातील, चिंता करू नका, असे आश्वासन दिले आहे.  औद्योगिक सामंजस्य करारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. नुसते करार करून चालणार नाही. आगामी काळात जे करार होतील त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकही वाढेल, अशी माहितीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.