पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान या 19 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असं या तरुणीचं नाव आहे. या घटनेने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.
वसतिगृहातील कॅन्टीन कर्मचाऱ्याची छेडछाड आणि रूममेटच्या छळाला कंटाळून तरुणीने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात 7 मार्च रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मृत विद्यार्थिनी मुस्कानसोबत राहत होती. दरम्यान, दोघांमध्ये सातयत्याने वाद होत असत. मुस्कान मृत विद्यार्थिनीची नेहमी छेड काढत होती. अभ्यास करत असताना लाईट बंद करणे, सारखे वाद घालणे आणि नेहमी कटकट करणे, असे वाद त्यांच्यात होत असत. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला सतत अश्लील मेसेज करुन त्रास द्यायचा. या सर्व प्रकारामुळं रेणुका खूप त्रासली व घाबरली होती. त्याचबरोबर, हॉस्टेलमध्ये तिच्याच रुममध्ये राहणारी मुस्कानदेखील तिला त्रास देत होती.
याप्रकरणी सतीश जाधव (रा. इंजिनिअरिंग कॉलेज कॅन्टीन) आणि मुस्कान महेंद्रसिंग सिदघु (वय 19रा. भारती विद्यापीठ ऑफ इंजिनेरिंग कॉलेज) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.