गेल्या वर्षीच्या उत्पादनाला मागे टाकत, एप्रिल 2022-फेब्रुवारी 2023 या कालावधीत कोळशाचे 784.41 दशलक्ष टन उत्पादन
नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारताचे कोळसा उत्पादन एप्रिल 2022-फेब्रु 2023 या कालावधीत 15.10% ने वाढून ते 784.41 दशलक्ष टन इतके झाले आहे. 2022 या आर्थिक वर्षात याच कालावधीत कोळसा उत्पादन 681.5 दशलक्ष टन झाले होते. कोल इंडिया लिमिटेडने 2022 मध्ये याच कालावधीत 542.38 दशलक्ष टनाच्या तुलनेत 2023 च्या फेब्रुवारी पर्यंत 619.70 दशलक्ष टन उत्पादनाची नोंद केली आहे.यानुसार 14.26% कोळसा उत्पादनात वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री गति शक्ती योजनेअंतर्गत कोळशाच्या जलद वाहतुकीसाठी सर्व प्रमुख खाणींसाठी रेल्वे दळणवळण पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालय पावले उचलत आहे. परिणामी, एप्रिल 2022- फेब्रुवारी 2023 या कालावधीत एकूण 793.86 दशलक्ष टन (तात्पुरती आकडेवारी) कोळसा पाठवला आहे. आर्थिक वर्ष 2022 मधील याच कालावधीत 7.14% वाढीसह 740.96 दशलक्ष टन होता. याचा अर्थ देशभरातील विविध क्षेत्रांना स्थिर आणि पुरेशा प्रमाणात कोळसा पुरविला गेला आहे.
कोळसा उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, मंत्रालयाने 141 नवीन कोळसा खाणी व्यावसायिक लिलावासाठी ठेवल्या आहेत आणि विविध कोळसा कंपन्या या लिलावात नियमितपणे सहभागी होत आहेत. मंत्रालय कोळसा उत्पादनावरही लक्ष ठेवत आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि पुरवठ्यासाठी केलेली वाहतूक या पातळीवर अत्यंत चांगले परिणाम दिसू लागले आहेत.