सिंधुदुर्ग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. अनेक दिवसानंतर हे दोघे दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. नारायण राणेंनी केलेल्या सेना नेत्यांवर केलेल्या हल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले ‘जे काही आधी बोलून गेले आहेत त्या विकासाच्या गोष्टी मी परत सांगणार नाही. आजचा क्षण हा आदळ आपट करायचा नाहीय, तर आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे मी तुमच खास अभिनंदन करेन कारण तुम्ही इतक लांब राहून देखील मराठीचे संस्कार वीसरला नाही. मातीचा एक संस्कार असतो आणि मातेचेही संस्कार असतात. काही वेळेला मातीच्या वेदना मातीच जाणते. या मातीत अनेक झाड उगवतात त्यात काही आंब्याची असतात तर काही बाभळीची असतात आता बाभळीची झाड उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं तर लागणारंच. माज्यासाठी आजचा दिवस हा खूप मोठा आहे, कारण कोकण आणि शिवसेना ही नात काय मी तुम्हाला सांगायला नको.
तसेच, ”कोणी काय केल, कोणी काय कराव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्या विषयावर बोलायच असेल तर मी खूप काही बोलू शकतो पण आजचा आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि महत्वाचा आहे. पर्यटन म्हटल्यावर साहजिकच राज्य येत ते आपल्या शेजारच गोवा राज्य. आपण गोवाच्या विरोधात नाही पण आपलं जे काही वैभव आहे, ऐश्वर्य आहे, संपन्नता आहे ती काही कमी नाहीय. आजपर्यंत अनेकजण बोलून गेले होते आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटले असं कोकण मी उभं करून दाखवेन.
पाठांतर करून बोलणं आणि आत्मसात करून बोलणं यात खूप फरक असतो. तमळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल नंतर बोलेन. असा टोला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून यावेळी राणेंना लगावला.
या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह नारायण राणे, विनायक राऊत, आदित्य ठाकरे, अजित पवार, रामदास आठवले बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.