ठाकरेंच्या हस्ते मुंबई ‘मेट्रो’ला हिरवा झेंडा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला मेट्रोतून प्रवास
मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार, असेही ठाकरे यांनी आवर्जून सांगितले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या २- अ या दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गावरील आणि मेट्रो ७ दहिसर ते आरे या दोन मार्गिकांचे उद्घाटन झाले. उदघाटनानंतर संत पायस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार गजानन किर्तीकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
Mumbai Metro Lines 2A (Phase 1) and 7 were inaugurated by CM Uddhav Thackeray ji, in presence of DCM Ajit Pawar ji and all of us, citizens of Mumbai.
I congratulate UD Minister Eknath Shinde ji and the @MMRDAOfficial team for their execution of the work, even through covid times pic.twitter.com/cLyWmfoUUF— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 2, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा विकास सातत्याने होत आहे. लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र सुविधा वाढवायच्या कशा हे आव्हान आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारचा सामान्य मुंबईकरांना सुविधा देण्याचा निश्चय आहे. कारण मुंबईच्या विकासात खरे योगदान सामान्य मुंबईकरांच्या कष्टाचे आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पूर्ततेसाठीही अनेक मुंबईकरांनी योगदान दिले आहे. त्यामुळे मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांना आहे.
मुंबईत अनेक विकासप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. मुंबई करांना आनंदाने जगता यावे, असे विकासप्रकल्प प्राधान्याने राबवत आहोत. त्यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, न्हावा शेवा ते शिवडी अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आनंदाने आणि जलद गतीने प्रवास करता येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पायाभूत विकासासाठी भरीव तरतूद – राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटाक्षाने लक्ष देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीनं वर्षात यासाठी चार लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईचा विकास करणे महाविकास आघाडी सरकारचे ध्येय आहे. मात्र हा विकास करताना मुंबईचे मुंबईपण हरवणार नाही, यांची काळजी घेतली जाणार आहे. मुंबई बरोबरच पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर येथील मेट्रो विकासालाही चालना देणार आहोत. राज्यातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असे श्री. अजित पवार यांनी सांगितले.
मेट्रोमुळे वाहतूक गतिमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मुंबईकरांसाठी राज्यशासनाने दिलेली गुढी पाडव्याची भेट असल्याचे सांगितले. मेट्रोमुळे वाहतूक गतिमान व्हायला मदत होईल. एमएमआरडीएने मुंबई विकासाला गतिमान करण्यावर भर दिला आहे. मुंबईच्या विकासाचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नजिकच्या काळात मेट्रो, मोनो, बेस्ट आणि लोकल यासाठी एकच तिकीट चालू शकेल, अशी प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
‘मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यावर भर‘ – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्य शासन मुंबईतील नागरिकांचे जीवन सुसह्य (ईज ऑफ लिव्हिंग) कसे होईल यावर भर देत आहेत. यासाठी छोट्या कामात लक्ष घालत आहोत. यामध्ये फुटपाथ सुधारणा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यांचा समावेश आहे, असे सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा मेट्रोतून प्रवास – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरे मेट्रो स्थानक येथे मार्गिका क्रमांक सातचे मेट्रो ला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. त्यानंतर आरे ते कुरार आणि परत असा प्रवास केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते.
कार्यक्रमास आमदार कपिल पाटील, विलास पोतनीस, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, सुनील प्रभू, पोलीस आयुक्त संजय पांडे, माजी महानगर आयुक्त आर. ए. राजीव आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त आयुक्त के. एच. गोविंदराज यांनी आभार मानले.
उद्घाटन झालेल्या मार्गिकांबाबत – दहिसर ते डहाणूकरवाडी या मेट्रो २अ मार्गावर ९ स्थानके असून यामध्ये दहिसर पूर्व,आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर, कांदिवली पश्चिम, डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश आहे. दहिसर ते आरे या मेट्रो ७ मार्गावर १० स्थानके आहेत. आरे,दिंडोशी,कुरार, आकुर्ली,पोयसर,मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान,ओवरी पाडा, दहिसर पूर्व या स्थानकाचा त्यात समावेश आहे.सुरुवातीच्या काळात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू राहणार असून एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असतील. एका मेट्रोमधून २२८० प्रवासी प्रवास करु शकतात.
स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे – सर्व स्थानकावर आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. अंध व्यक्तींना स्पर्श मार्ग तयार करण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्टेशनवर महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व स्टेशनच्या परिसरात कैमेरे बसविण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन साठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली विकसित करण्यात आली आहे.