Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्तारावर होऊ शकते चर्चा

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली दौऱ्यात ते महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू शकतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असेल. राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जोरदार बंड केल्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणि भाजपच्या गटातील 10-12 मंत्री मंत्रिमंडळासाठी शपथ घेणार आहेत.
यापूर्वी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले होते. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले होते. आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी निर्णय घेत आहोत, कोण काय बोलतात याचे उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही. असं ते म्हणाले होते.