राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान

WhatsApp Group

मुंबई : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गेट-वे ऑफ इंडिया येथे उद्या दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी  दुपारी  3.00 ते सायं.6.00 या वेळेत होणाऱ्या स्वच्छता अभियानात नागरिक, स्वयंसेवी संस्था व पर्यटनप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

27 सप्टेंबर, 2022 या दिवशी जागतिक पर्यटन दिन जगभरात साजरा केला जातो. पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन मंत्री, मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुप्रसिद्ध असणाऱ्या मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन  विभाग व दिव्याज फाऊंडेशन यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे.

या अभियानात श्रीमती अमृता फडणवीस, दिव्याज फाउंडेशनचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.