
मुंबई | १८ मे २०२५ — भारतात सीएनजी वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, सिट्रोएन इंडियाने आपल्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक C3 ला आता CNG किटसह सादर केले आहे. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स यांच्यानंतर आता सिट्रोएनदेखील सीएनजी सेगमेंटमध्ये उतरली असली, तरी ही किट डीलर लेव्हलवर फिट केली जाणार आहे आणि त्यासाठी ₹९३,००० इतका अतिरिक्त खर्च ग्राहकाला करावा लागणार आहे.
सिट्रोएन C3 CNG ची एक्स-शोरूम किंमत ₹७.१६ लाख ते ₹९.२४ लाख दरम्यान आहे. या कारचे Live, Feel, Feel(O) आणि Shine हे चार व्हेरियंट्स बाजारात उपलब्ध असणार आहेत. परंतु सीएनजी किटची वेगळी किंमत पाहता, ही कार प्रतिस्पर्धी मॉडेल्सच्या तुलनेत महाग वाटते. सिट्रोएनने यापूर्वीच विक्रीच्या आकड्यांमध्ये अडथळे पाहिले आहेत आणि ही किंमत वाढ ग्राहकांना कितपत भरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इंजिन, मायलेज आणि परफॉर्मन्स
या CNG वेरियंटमध्ये १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे पेट्रोलवर ८२ HP पॉवर आणि ११५ Nm टॉर्क निर्माण करते. यात ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. CNG मोडमध्ये ही कार १ किलो CNGमध्ये सुमारे २८ किमी मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.
सिट्रोएनने कारचे मागील सस्पेन्शन सुधारले आहे, ज्यामुळे राइडचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक असेल. मात्र CNG मोडमध्ये टॉर्क किती मिळेल, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.
फीचर्स
सिट्रोएन C3 CNG मध्ये ग्राहकांना पेट्रोल आणि CNG मोडमध्ये सहज स्विच करण्याची सुविधा दिली आहे. फॅक्टरी-इंजिनिअर्ड कॅलिब्रेशनमुळे दोन्ही मोड्समध्ये ड्रायव्हिंग अनुभव अखंड राहतो. कंपनीच्या मते, ही कार चालवण्याचा खर्च प्रति किमी फक्त ₹२.६६ इतका येतो.
सर्व व्हेरियंट्सवर ३ वर्षे / १ लाख किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. डिझाइनच्या बाबतीत ही कार स्टायलिश असून, केबिनमध्ये पुरेशी जागा आहे. मात्र, प्लास्टिक क्वालिटी आणि बिल्डचा अनुभव तुलनात्मकदृष्ट्या सामान्य असल्याचे ग्राहकांनी यापूर्वी नमूद केले आहे.
सिट्रोएन C3 CNG ची थेट टक्कर मारुती वॅगनआर CNG, टाटा पंच CNG आणि टियागो CNG सारख्या कार्ससोबत होणार आहे. मायलेजच्या बाबतीत ही कार सक्षम असली, तरी किंमत आणि ब्रँड विश्वासार्हतेच्या बाबतीत अजूनही सिट्रोएनला स्पर्धकांशी झुंज द्यावी लागेल.