Dance Video: चीनची चिमुकली ‘दीपिका’! ‘धूम ताना’ गाण्यावर चिनी मुलीचा कडक डान्स; पाहून भारतीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
चीनची चिमुकली ‘दीपिका’! ‘धूम ताना’ गाण्यावर चिनी मुलीचा कडक डान्स; पाहून भारतीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
बीजिंग: संगीत आणि कलेला सीमा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘धूम ताना’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. मात्र, सध्या एका चिनी चिमुरडीने या गाण्यावर केलेला डान्स पाहून भल्याभल्या डान्सर्सचे पाय थिजले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, तिचे हावभाव पाहून नेटकरी तिला ‘चीनची दीपिका’ म्हणत आहेत.
शिनजियांगच्या रेस्टॉरंटमध्ये उडाला धुरळा
मिळालेल्या माहितीनुसार, हा परफॉर्मन्स चीनच्या शिनजियांगमधील एका ‘कझाक’ रेस्टॉरंटमध्ये झाला. तिथे लोक जेवणाचा आस्वाद घेत असताना या चिमुरडीने स्टेजचा ताबा घेतला. श्रेया घोषाल यांच्या आवाजातील ‘आए मोहे लाज सजनी’ हे बोल सुरू होताच, या मुलीने अशा काही हालचाली केल्या की पूर्ण रेस्टॉरंट स्तब्ध झाले. तिने घातलेला भारतीय धाटणीचा पोशाख या गाण्याला अधिकच साजेसा दिसत होता.
दीपिका पदुकोणसारखे हावभाव आणि ग्रेस
या चिमुकलीच्या डान्समध्ये केवळ ऊर्जाच नव्हती, तर तिचे एक्सप्रेशन्स अगदी हुबेहूब दीपिका पदुकोणसारखे होते. गाण्यातील प्रत्येक बीटवर तिचे फुटवर्क इतके अचूक होते की पाहणारे थक्क झाले. भारतीय संस्कृती आणि बॉलीवूड डान्सची तिने केलेली नक्कल पाहून कोणालाही विश्वास बसत नव्हता की ही मुलगी चीनमधील आहे.
सोशल मीडियावर १० लाखांहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड होताच काही तासांत १० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, तर १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये भारतीय युजर्सनी या चिमुरडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कलेने सरहद्दी ओलांडल्या आहेत,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
