Viral Video: प्राणी मोकाट अन् माणसं पिंजऱ्यात! चीनमधील ‘या’ अजब प्राणीसंग्रहालयाची जगभर चर्चा, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

प्राणीसंग्रहालय म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते पिंजऱ्यात बंद असलेले वाघ, सिंह आणि त्यांना बाहेरून पाहणारे प्रेक्षक. मात्र, चीनमधील चोंगकिंग शहरात एक असे प्राणीसंग्रहालय आहे, जिथे हा नियम पूर्णपणे उलटा लागू होतो. ‘लेहे लेदु वाइल्डलाइफ झू’ (Lehe Ledu Wildlife Zoo) नावाच्या या प्राणीसंग्रहालयात माणसे लोखंडी पिंजऱ्यात कैद होऊन फिरतात आणि हिंस्र वाघ-सिंह त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर मोकाट फिरत असतात. पर्यटकांना भीतीचा खरा अनुभव देण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला जातो.

थक्क करणारा अनुभव आणि जिवावरचा थरार

या प्राणीसंग्रहालयाची संकल्पना अत्यंत थरारक आहे. येथे पर्यटकांना एका मजबूत लोखंडी पिंजरा असलेल्या ट्रकमध्ये बसवले जाते. हा ट्रक जेव्हा जंगलासारख्या भागात प्रवेश करतो, तेव्हा मोकाट फिरणारे सिंह आणि वाघ माणसांना पाहून त्यांच्या दिशेने धावत येतात. अनेकदा हे प्राणी पिंजऱ्यावर झडप घालतात, ज्यामुळे आत बसलेल्या पर्यटकांच्या अंगावर शहारे येतात. प्राण्यांना पिंजऱ्याच्या अगदी जवळ ओढण्यासाठी पिंजऱ्याच्या बाहेर मांसाचे मोठे तुकडे लटकवले जातात. हे मांस खाण्यासाठी जेव्हा सिंह डरकाळी फोडत पिंजऱ्याला धडक देतात, तेव्हा पर्यटकांना मृत्यू अगदी जवळून पाहिल्याचा भास होतो.

पर्यकांसाठी कडक नियमावली

येथे मिळणारा अनुभव जितका रोमांचक आहे, तितकाच तो धोकादायकही आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून पर्यटकांना आधीच स्पष्ट सूचना दिल्या जातात. पर्यटकांनी चुकूनही आपले हात किंवा बोटे पिंजऱ्याच्या बाहेर काढू नयेत, असे बजावण्यात येते. पिंजरा अत्यंत मजबूत असला तरी, हिंस्र प्राण्यांची ताकद आणि चपळाई पाहता थोडीशीही चूक जिवावर बेतू शकते. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊनच हा प्रवास पूर्ण केला जातो.

३ महिने आधी करावी लागते बुकिंग

या अजब प्राणीसंग्रहालयाची लोकप्रियता इतकी आहे की, येथील सफारीसाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. साहसी पर्यटनाची आवड असणारे लोक जगभरातून येथे येतात. विशेष म्हणजे, या अनोख्या अनुभवासाठी पर्यटकांना तब्बल तीन महिने आधी तिकीट बुक करावे लागते. जेव्हा एखादा हिंस्र प्राणी तुमच्या मागे लागतो, तेव्हा नक्की कशी भावना असते, याचा प्रत्यक्ष अनुभव देणारे हे जगातील कदाचित एकमेव ठिकाण असावे.