चीनमध्ये कंडोमवर टॅक्स, पण लग्नावर सवलत; जन्मदर वाढवण्यासाठी जिनपिंग यांची नवी खेळी

WhatsApp Group

जगातील एकेकाळचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन सध्या एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे. चीनमधील जन्मदर ऐतिहासिक पातळीवर घसरल्यामुळे चिंतेत असलेल्या शी जिनपिंग सरकारने आता एक विचित्र पाऊल उचलले आहे. १ जानेवारी २०२६ पासून चीनमध्ये कंडोम आणि इतर गर्भनिरोधक साधनांवर १३ टक्के विक्री कर (Sales Tax) लागू करण्यात आला आहे. गर्भनिरोधक महाग केल्यास लोक मुले जन्माला घालण्यास प्रवृत्त होतील, असा अजब तर्क सरकारकडून लावला जात आहे.

कर प्रणालीत मोठे बदल आणि सवलती

चीनने आपल्या जुन्या कर प्रणालीत सुधारणा करताना १९९४ पासून सुरू असलेल्या अनेक सवलती रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे, जिथे कंडोम महाग करण्यात आले आहेत, तिथेच मुलांच्या संगोपनाशी संबंधित सेवा, विवाह सेवा आणि वृद्धांची देखभाल करणाऱ्या केंद्रांना मूल्यवर्धित करातून (VAT) पूर्णपणे मुक्त करण्यात आले आहे. पालकांना मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये वाढ आणि रोख आर्थिक मदत देऊन तरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, गर्भनिरोधकांवरील कर वाढवल्याने सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि उपरोधाची भावना निर्माण झाली आहे.

जनतेकडून सरकारची थट्टा

चीनच्या या निर्णयावर सोशल मीडियावर विनोदाचा पूर आला आहे. एका युजरने उपरोधाने म्हटले की, “मी आताच आयुष्यभरासाठी कंडोमचा साठा करून ठेवतो,” तर दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, “कंडोम महाग झाले म्हणून कोणी मुले जन्माला घालणार नाही; कारण कंडोमची किंमत आणि मुलाच्या संगोपनाचा खर्च यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.” तज्ज्ञांच्या मते, कंडोम महाग केल्यामुळे अनपेक्षित गर्भधारणा आणि एचआयव्ही (HIV) सारख्या गंभीर आजारांचा प्रसार वाढण्याची भीती आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट किंवा विद्यार्थी सुरक्षेची जोखीम पत्करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महागडे शिक्षण आणि आर्थिक मंदीचे सावट

चीनमध्ये सलग तीन वर्षांपासून लोकसंख्या घटत आहे. २०२४ मध्ये चीनमध्ये एक कोटीपेक्षा कमी बालकांचा जन्म झाला, जो एका दशकापूर्वीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. बीजिंगमधील एका संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, जगात मुलांचे संगोपन करणे ज्या देशात सर्वात महाग आहे, त्यापैकी चीन एक आहे. प्रचंड स्पर्धात्मक शिक्षण, महागडी शालेय फी आणि महिलांना नोकरी व मूल सांभाळताना करावी लागणारी कसरत यामुळे चिनी तरुण मुले जन्माला घालण्यास घाबरत आहेत. देशातील मालमत्ता संकट आणि आर्थिक मंदीमुळे लोकांच्या बचतीवर परिणाम झाला असून, भविष्याबद्दलची अनिश्चितता हेच कमी जन्मदराचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.