१५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु, जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया

WhatsApp Group

देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानं पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या मुलांना भारत बायोटेकची ‘कोव्हक्सिन’ ही लस दिली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं यासाठी नोंदणी करता येणार आहे.जगभरात कोरोनाचं संकट आणखी गडद होताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. देशावरील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट परतवून लावण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया आणखी गतिमान करण्यात आली आहे. भारतात १५ ते १८ वयोगटातील मुलांना आजपासून  लस देण्यात येत आहे. या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

लसीकरणाची नेमकी प्रक्रिया काय?

https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर किंवा कोविन अपवर नाव नोंदणीची प्रक्रिया करता येईल. त्यासाठी आधार क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. आधार कार्ड नसल्यास शाळेच्या ओळखपत्राच्या आधारे लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. शिवाय कोविनवरील Add More या बटनावर क्लिक केल्यास मोबाईक क्रमांकाद्वारे एकावेळी ४ जणांची लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य आहे. नाव नोंदणी करताना लिंग, जन्मतारीख, पिन कोड इत्यादी माहितीअ‍ॅपवर भरावी लागेल. केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने लसीकरणाची सुविधाही उपलब्ध आहे.

लस कोणाला मिळू शकणार नाही?

महाराष्ट्रात जवळपास ६५० केंद्रांवर आजपासून लहानग्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात १५ ते १८ वयोगटातील सुमारे ६० लाख मुलांचं लसीकरण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.

लहान मुलांचं लसीकरण का महत्वाचं?

देशात कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लस उपलब्ध नसल्याने अनेकांनी आपला जीव गमावला. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. देश-विदेशातील विविध कंपन्यांच्या कोरोना लशी बाजारात उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी होतो. शिवाय, ऑक्सिजनची कमतरता किंवा आयसीयूची गरज रुग्णाला भासत नाही. लस घेतल्यानं शरिरात अँटीबॉडिज तयार होतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मोठ्या काळानंतर देशासह राज्यात शाळा, कॉलेज सुरु करण्यात आली आहेत. देशात १५ ते १८ वयोगटातील जवळपास ८ ते ९ कोटी लोकसंख्या आहे. त्यातच ओमायक्रॉनचा प्रसार वेगानं होत असल्यानं या मुलांचं लसीकरण अत्यंत महत्वाचं आहे. लहान मुलांना देण्यात येत असलेल्या लशीच्या अनेक यशस्वी क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आलेल्या आहेत. ही लस अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक आहे. या लशीमुळे कुठलीही रिएक्शन किंवा आरोग्य समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे पालकांनी अफवांकडे दुर्लक्ष करत आपल्या पाल्यांना लशीचा पहिला डोस लवकरात लवकर देणं गरजेचं आहे.

– रेणुका शेरेकर