
यावर्षी भारतातून ऑस्करसाठी गेलेला गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ चित्रपटातील बालकलाकार राहुल कोळी याचे कर्करोगाने निधन झाले आहे. या चित्रपटात अभिनेता भावीन रबारी मुख्य भूमिकेत असून राहुल कोळी त्याच्या मित्राच्या भूमिकेत दिसला होता. या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या राहुलला कर्करोग झाला होता. त्याच्या वडिलांनी सांगितले की, राहुलला अधूनमधून ताप येत होता आणि त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या.
वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी राहुलने जगाचा निरोप घेतला. राहुलने अहमदाबादमधील कर्करोग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 14 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी राहुलच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे.
राहुलच्या मृत्यूची माहिती देताना त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्याने नाश्ता केला होता. त्यानंतर त्याला वारंवार ताप येऊ लागला. काही वेळाने त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तीन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर माझे बाळ या जगात राहिले नाही.