आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – देशभरात गॅसदरवाढीची (Gas cylinder price) झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.तसंच इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांनाही केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी,तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज शनिवारी केली.
त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारचे आभार मानत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायला हवे. आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको, अशी टीका ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केलीय.
केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.