
मुंबई – ‘शिवसेनेत गद्दार आता कुणीही राहिला नाही. कितीही फाटाफूट झाली तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती, त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेमध्ये नको. तो आज काय उद्या सुद्धा मला नको आहे’ असे म्हणत विधान परिषदेच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत नाराजांना सुनावलं.
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहामध्ये पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर कडक इशारा दिला.
‘आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीमध्ये अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक आहे. मला निवडणुकीची चिंता नाही. हारजीत होत असतेच. मी ठामपणे सांगतो आम्ही जिंकणारच आहोत. मागे राज्यसभा निवडणुकीमध्ये झालं ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटलं ते सगळं समोर आलंय. हळूहळू ते कळेलच, असं सूचक विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं.