ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

WhatsApp Group

मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.