गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन

WhatsApp Group

मुंबई: महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, सिनार्मस पल्प अँड पेपर प्रा. लि. कंपनीचे संचालक सुरेश किल्लम, कंपनीचे भारतातील प्रमुख सिद्धार्थ फोगट आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात उद्योगांचा विस्तार तसेच गुंतवणूक करताना उद्योगांनी कोणतीही काळजी करु नये, सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील. उद्योग उभारल्यानंतर त्या भागात रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा देखील निर्माण करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.