मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चालविले वाहन

वर्धा: येत्या काही दिवसात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले.
वर्धा जिल्ह्यात महामार्गावर दोन टोल प्लाझा देण्यात आले आहेत. यापैकी विरुळ येथे टोल प्लाझा व परिसराची त्यांनी पाहणी केली. येथे आगमण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.
And the moment is here!
Team Maharashtra actually made it happen and we are actually driving on this dream come true #Samruddhi Super Communication Expressway #SamruddhiMahamarg !
We did it, CM @mieknathshinde ji 🤝🏼!
We started from #Nagpur this morning towards Shirdi.. pic.twitter.com/JBiIVY9gDb— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2022
वर्धा जिल्ह्यात 55 किमीचा मार्ग
वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात आहे. एकूण लांबी 55 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर 5 मोठे व 27 लहान अशा 32 पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतूक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग आहे. महामार्गासाठी 782 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे तर 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.