शिकागो (अमेरिका): जगात खाण्यापिण्याच्या शौकिनांची कमतरता नाही, मात्र अमेरिकेतील शिकागोमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने अन्नाची जी व्याख्या केली आहे, ती ऐकून कोणालाही मळमळल्याशिवाय राहणार नाही. २६ वर्षांचा कार्लोस नावाचा हा तरुण दररोज एक-दोन नव्हे, तर तब्बल १०० जिवंत कीडे आणि झुरळे फस्त करतो. यामागील त्याचे कारण केवळ भूक नसून, एक अत्यंत विचित्र मानसिक समाधान असल्याचे त्याने एका प्रसिद्ध शोमध्ये सांगितले आहे.
कीड्यांच्या चवीची तुलना बटर पॉपकॉर्नशी
‘माय स्ट्रेंज ॲडिक्शन’ (My Strange Addiction) या टीएलसी वरील शोमध्ये कार्लोसने आपल्या या अजब आवडीचा खुलासा केला. कार्लोसच्या मते, जिवंत कीडे हे त्याचे आवडते ‘स्नॅक्स’ आहेत. तो म्हणतो की, या कीड्यांची चव अगदी ‘बटर पॉपकॉर्न’ सारखी लागते. इतकेच नाही, तर झुरळांच्या आतील भागाची चव त्याला ‘कस्टर्ड’ सारखी वाटते. त्याच्या या अजब दाव्याने केवळ शोचे प्रेक्षकच नव्हे, तर आरोग्य तज्ञही थक्क झाले आहेत.

जिभेची मालिश आणि घशात गुदगुल्या
कार्लोसने या सवयीमागील जे कारण सांगितले आहे ते अधिकच भयानक आहे. त्याला कीड्यांनी आपल्या तोंडावर रेंगणे, जिभेवर चालणे आणि घशात गुदगुल्या करणे खूप आवडते. तो म्हणतो, “जेव्हा हे कीडे माझ्या तोंडात इकडे-तिकडे रेंगतात, तेव्हा मला मिळणारा आनंद कोणत्याही महागड्या अन्नापेक्षा मोठा असतो. मी या कीड्यांचा जीव घेतो तेव्हा मला त्यांच्या नशिबाचा मालक असल्यासारखे वाटते.” त्याच्या या विधानाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
बेरोजगारी आणि आर्थिक ओढाताण
धक्कादायक बाब म्हणजे कार्लोस सध्या बेरोजगार आहे, तरीही तो कीडे खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करतो. हे कीडे स्वस्त नसतात; शोमध्ये त्याला केवळ मीलवर्म्स आणि झुरळे खरेदी करण्यासाठी ८ डॉलर्स खर्च करताना दाखवण्यात आले आहे. त्याची पार्टनर त्याच्या प्रकृतीबद्दल आणि पैशांच्या अपव्ययाबद्दल काळजीत आहे. मात्र, वयाच्या ४ थ्या वर्षापासून लागलेली ही चटक कार्लोस सोडायला तयार नाही. जिवंत कीडे खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून यामुळे संसर्ग किंवा विषबाधा होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
