
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) दिलेला शब्द मोडला. ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. मी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर देण्यात आली. परंतु मी त्यास नकार दिला. परंतु शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडी उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्त्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सगळं काही ठरलं. त्यांचे खासदार, मंत्र्यांशी चर्चा देखील केली. पण कोल्हापूरला जाताना वेगळ्याच बातम्या समोर आल्या असा खुलासा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीराजे(Yuvraj Chhatrapati Sambhajiraje) म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. परंतु मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझे व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीमधून माघार घेतोय. ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारे माझे व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे. संपूर्ण राज्यभरात दौरे करून संघटनेला उभारी देणार आहे. मला माझी ताकद ४२ आमदार नाही तर जनता आहे असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.