T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाला. यानंतर बीसीसीआयने (बीसीसीआय) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली होती. आता बीसीसीआयने नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय चारही नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे.
चेतन शर्मासह शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांना निवड समितीमध्ये स्थान मिळाले आहे. बीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली होती. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त करून नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर आता नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्यावर विश्वास टाकत त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.
NEWS 🚨- BCCI announces All-India Senior Men Selection Committee appointments.
Mr Chetan Sharma recommended for the role of Chairman of the senior men’s selection committee.
More details 👇👇https://t.co/K5EUPk454Y
— BCCI (@BCCI) January 7, 2023
चेतन शर्माने भारताकडून 23 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळले आहेत. माजी सलामीवीर शिव सुंदर दासने भारतासाठी 23 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताकडून खेळणारा तो ओडिशाचा फक्त तिसरा खेळाडू होता. सुब्रतो बॅनर्जी यांनी भारतासाठी एक कसोटी आणि 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1992 मध्ये तो टीम इंडियाचा भाग होता. माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोलाने भारतासाठी केवळ एकच कसोटी खेळली आहे. सचिनसह त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. त्यांनी मुंबई संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहिले आहे. तामिळनाडूचा माजी क्रिकेटपटू श्रीधरन शरथला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. मात्र त्याने 139 प्रथम श्रेणी आणि 116 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यासोबतच त्यांनी मॅच रेफ्रीचीही भूमिका बजावली आहे.