सलग चौथ्या पराभवामुळे चेन्नईचा संघ IPL २०२२ मधून बाहेर पडण्याची शक्यता!

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जला Chennai Super Kings सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मोसमात आतापर्यंत सीएसकेला विजयाचे खाते उघडता आले नाही आज (शनिवारी) सनरायझर्स हैदराबादने Sunrisers Hyderabad रवींद्र जडेजाच्या संघाला एकतर्फी लढतीत पराभूत केले. हैदराबादने या मोसमात प्रथमच विजयाची चव चाखली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला केवळ 155 धावांचे लक्ष्य दिले होते, ते अभिषेक शर्माच्या झंझावाती खेळीच्या जोरावर हैदराबादने सहज गाठले. 21 वर्षीय अभिषेक शर्माने 75 धावांची धमाकेदार खेळी खेळली आणि आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. हैदराबादने चेन्नईवर 8 गडी राखून मात केली.

या मोसमातील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादविरुद्ध चांगली सुरुवात केली, मात्र त्यांना त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड चांगले खेळताना दिसत होते मात्र त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. नंतर अंबाती रायुडू (२७ धावा) आणि मोईन अली (४८ धावा) यांनी संघाची धावसंख्या काही प्रमाणात नेली, पण मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही.

चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला केवळ 3 धावा करता आल्या. त्याच्याआधी शिवम दुबेही 3 धावा करून बाद झाला. मात्र, अखेरीस कर्णधार रवींद्र जडेजाची धडाकेबाज खेळी आणि ड्वेन ब्राव्होच्या कॅमिओच्या जोरावर चेन्नईला दीडशेचा टप्पा गाठता आला. चेन्नईने हैदराबादला 155 धावांचे आव्हान दिले होते.

चेन्नईने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ५० चेंडूत ७५ धावा करत त्याने IPL कारकिर्दीतील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. केन विल्यमसन सोबत त्याने ८९ धावांची सलामी दिली. विल्यमसन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १५ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादचा संघ – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को येन्सन, उमरान मलिक, टी. नटराजन.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा(कर्णधार), शिवम दुबे, एमएस डोनी, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तिक्षन, मुकेश चौधरी