दिल्लीचा पराभव करत चेन्नईचा संघ IPLच्या अंतिम फेरीत दाखल
दुबई – इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 4 गडी राखून पराभव केला. चेन्नईने या विजयासह आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज ने तब्बल नवव्या वेळेस IPL च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने (MS dhoni) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 19.4 षटकांत 6 विकेट गमावत 173 धावा केल्या आणि सामना जिंकला. हा विजय चेन्नईसाठी खूप खास होता कारण अनेक दिवसांनी धोनी फॉर्मात आला होता. धोनीने या सामन्यात विजयात विजयी चौकार खेचक 300 च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूत नाबाद 18 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
एमएस धोनीशिवाय रॉबिन उथप्पाने 44 चेंडूत 63 आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) चेन्नईसाठी 50 चेंडूत 70 धावा केल्या. तर मोईन अलीनेही 12 चेंडूत 16 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने केलेल्या शानदार फलंदाजीसाठी त्याला सामानावीर पुरस्कार देण्यात आला. दिल्लीच्या संघासाठी टॉम करण सर्वात यशस्वी ठरला. त्याने 22 चेंडूत 19 धावा देऊन 3 बळी घेतले. एनरिक नॉर्टजे आणि अवेश खान यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, सलामीवीर पृथ्वी शॉ, कर्णधार रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनी दिल्ली कॅपिटल्सला 172 धावा पूर्ण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. पृथ्वीने 34 चेंडूत 60 तर पंतने 35 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. हेटमायर 24 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. चेन्नईकडून जोश हेजलवूडने 2 आणि रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने या सामन्यात त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने रिपल पटेलच्या जागी टॉम करनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले होते. या सामन्यात रिषभ पंतच्या (rishabh pant) नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे. रिषभ पंत हा आयपीएल इतिहास प्लेऑफमध्ये नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे.