”मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली…”, चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका

WhatsApp Group

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात संशयाचं वादळ फिरत होतं. यात शरद पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला होता. मात्र आता भाजपकडूनही शरद पवार यांना उत्तर देण्यात आलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना ट्वीट करत उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की,

ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात.

मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा.

बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे.