चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

WhatsApp Group

चंद्रपूर : चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरीता उपाययोजना आखण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपुर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर येथील वन पर्यटन, पर्यावरण व व्याघ्र संवर्धन, आणि आदिवासींच्या वनोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.

वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबर मधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकारीवर्गाला दिले. या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यापलिकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.