Maharashtra Weather Update: पुढील तीन दिवस ‘या’ भागात गारांसह पावसाची शक्यता

WhatsApp Group

Maharashtra Weather Forecast Update: मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. यासोबतच काही ठिकाणी गारपीटही झाली असून या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर आणि मुंबई ठाण्यासह राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. ते म्हणाले की, काही ठिकाणी गारपीट झाली आहे.

पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज
अधिक माहिती देताना ते म्हणाले, पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

उपराजधानीसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारपासून नागपूर शहरात पावसाने हजेरी लावली, तर इतर जिल्ह्यांतही बुधवारपासून पाऊस झाला. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिला असून, गुरुवारी काही जिल्ह्यांत अतिवृष्टी आणि गारपिटीचा इशाराही दिला आहे.

बुधवारी सायंकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. सर्वत्र आकाश ढगांनी भरलेले आहे. बुधवारी चंद्रपूर शहरात पाऊस झाला, तर काल बुलढाणा शहरात जोरदार पाऊस झाला. नागपूर शहरात मंगळवारपासून ढगाळ वातावरण असून, अवकाळी पाऊस पडत आहे. सर्वत्र ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे आणि आकाश ढगांनी भरले आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे सुरू झाले असून कधीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.