पुणे – आंब्याचा मोसम असताना गेल्या दोन महिन्यांपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अधूनमधून पाऊस होत असताना आता पुन्हा कोकण, दक्षिण महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी प्रथमच एप्रिल महिन्यात कोकणात पाऊस होताना दिसून येत आहे.
विदर्भात सर्वत्र सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असून राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
गेल्या २४ तासामध्ये कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली येथे पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील अनेक ठिकाणच्या तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी १९, २० आणि २१ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी २० व २१ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.