नवी दिल्ली – ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पुढचे 4-5 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. तर काही भागात वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दिल्ली येथील हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. दक्षिण भागात वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाचा तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात तीन ते चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर पुणे, सोलापूर भागातदेखील हलक्या पावसाची शक्यता आहे.
लक्षद्विप-द/पु अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र.3 दिवसात वरच्या दिशेने येवुन दाट होण्याची शक्यता.लक्षद्विप-कर्नाटक किनारपट्टीत द्रोणीय स्थिती.यामुळे पुढचे 4-5 दिवस,द कोकण,द मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे 6-7 हलका पाऊस pic.twitter.com/YHcIA4SQ42
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 3, 2021
सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील कामे सुरू आहेत. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना काही ठिकाणी पेरणीलाही सुरवात झाली आहे. त्यामुळे आता पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पीक वाढीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशात या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता
पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रसह तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. श्रीलंकेपासून 250 कीमी अंतरावर चक्रीवादळ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून या राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे